मुंबई महापालिका करणार ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, कोरोनाचा धोका असणाऱ्यांचा शोध घेऊन करणार औषधोपचार

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्चला आढळून आला. त्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ३ हजार ४४५ बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर

मुंबई:  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्चला आढळून आला. त्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ३ हजार ४४५ बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर  महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या २ हजार ८८२ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच बाधितांपैकी १५० रूग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेता, ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका संभवू शकतो. त्यातही यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या व दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी तपासल्या असता ज्या ज्येष्ठ नागरिकांना अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड विषयक आजार, अनियंत्रित दमा यासारख्या बाबी आहेत त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका संभवू शकतो, अशा ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व वैद्यकीय दृष्टिकोनातून एक विशेष सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका हाती घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, कर्करोग, अनियंत्रित दमा, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड विषयक आजार, श्वसनाचे आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंद प्राधान्याने घेतली जाणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार केले जाणार आहेत. प्राधान्याने झोपडपट्टी परिसरात करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणादरम्यान आढळून येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना बाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचारदेखील करण्यात येणार आहेत. 

 या सर्वेक्षणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय एका गटाचे गठन करण्यात येत असून त्यांच्याद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या चमूमध्ये २ ‘कम्युनिटी हेल्थ वर्कर’ वा ‘आशा वर्कर’ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन एस एस) स्वयंसेवक देखील यांना मदत करणार आहेत. या गटातील व्यक्ती घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेणार आहेत. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाशी संबंधित विकार, दमा, मूत्रपिंडविकार, कर्करोग आदी आजार इत्यादी असल्यास त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. तसेच हे आजार अनियंत्रित स्वरूपाचे असल्यास किंवा अशा व्यक्तींना कोणतेही औषध उपचार सुरू नसल्यास त्यांना त्यांच्या घराजवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात यथायोग्य औषधोपचार सुरू करण्यासाठी पाठविले जाणार आहे.अशा व्यक्ती महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी आल्यानंतर त्यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी (oxygen level) ही ‘ऑक्सी मिटर’ यंत्राद्वारे मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून आल्यास त्यांना तात्काळ निकटच्या ‘नाॅन‌ कोविड’ रुग्णालयात पुढील आवश्यक त्या उपचारांसाठी पाठविले जाणार आहे. या कामासाठी आवश्यक  प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येत आहे. तर सर्वेक्षण पत्राचे नमुने तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

 बृहन्मुंबई महानगरपालिकेची काही उपनगरीय रुग्णालये ही ‘नॉन कोव्हिड’ रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये सांताक्रूझ पूर्व परिसरातील विष्णुप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वोपचार रुग्णालय,  मालाड पूर्व परिसरातील सदाशिव कानोजी पाटील मनपा सर्वोपचार रुग्णालय, बोरीवली पूर्व परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, विक्रोळी परिसरातील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड…पूर्व परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रुग्णालय इत्यादी उपनगरीय रुग्णालयांच्या समावेश आहे. या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुमारे ३०० खाटा ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी आहेत. वरील व्यतिरिक्त राज्य शासनाच्या जेजे समूह रुग्णालयामध्ये १०० खाटा या ‘नॉन कोव्हिड’ रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहे. याव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयातील धर्मादाय खाटांचा उपयोग देखील या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.