मुंबई पालिकेकडून बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा, टीडीआर प्रक्रिया होणार ऑनलाईन

कोरोना महामारीच्या(Corona) काळात आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला आता दिलासा मिळणार आहे.

    मुंबई: विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर)(TDR) घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा(TDR Process Online) मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या(Corona) काळात आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला आता दिलासा मिळणार आहे.

    मुंबईकरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन यंत्रणा अध्ययावत करण्यावर पालिकेने भर दिला आहे. प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवून कोरोनाच्या संकट काळात त्यातून पालिकेला आर्थिक बळकटी देण्यासाठी पालिका आता पावले उचलत आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेची टीडीआर घेण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन करून बांधकाम क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्याचा पालिकेचा विचार आहे.

    सध्या पालिकेच्या विकास नियोजन विभागात डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट (डिसीआर) ची प्रक्रिया ऑनलाइन झाली असून टीडीआर घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि गतिमान करण्यात येईल, अशी माहिती प्रमुख अभियंता सी. पी. चिटोरे यांनी दिली.

    राज्य सरकारने विकास प्रस्तावा समोरील रस्त्यांच्या रुंदीनुसार ०.४० ते १.४० पट टीडीआर वापरण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर इमारतींचे बांधकाम क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले आहे.

    आरक्षण आणि बांधकाम टीडीआरच्या माध्यमातून निर्माण झालेला टीडीआर हे बांधकाम व्यावसायिक विकत घेतात. मात्र, बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे टीडीआर निर्मिती आणि मागणी यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे या टीडीआरचे भाव निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे अनेक विकासक बांधकाम टीडीआरच्या मोबदल्यात हाती घेतलेली कामे करण्यास उत्साह दाखवत नसून त्याचा फटका पालिकेच्या कामांना बसू लागला आहे. अशा स्थितीत टीडीआरबाबत पालिकेने निर्णय घेतल्यास बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.