मृतदेहांचे व्हिडिओ प्रसारित न करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई :कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना सध्या सगळे जग करीत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात या आजाराच्या वैद्यकीय तपासणीची संख्या सर्वाधिक असून सर्वाधिक संसर्गदेखील बृहन्मुंबई महापालिका

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना सध्या सगळे जग करीत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात या आजाराच्या वैद्यकीय तपासणीची संख्या सर्वाधिक असून सर्वाधिक संसर्गदेखील बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय अक्षरश: दिवस-रात्र एक करून रुग्णसेवा करीत आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर खात्यांचेही कर्मचारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे आपल्या सेवा देत आहेत. मात्र, असे असताना मूळ कारणमीमांसा समजून न घेता रुग्णालयातील मृतदेहांचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. रात्रंदिवस काम करत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबलाचे खच्चीकरण करणारी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारांची दखल घेऊन प्रशासनाने सर्व संबंधितांना या अनुषंगाने पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत. यंत्रणेकडून तशी सतर्कता बाळगण्यात येत आहे.   

महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर अव्याहतपणे वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय उपचार सुरू असताना काही रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. एखाद्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर निर्धारित वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) सदर रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची अंतिम तपासणी व नोंद करण्याची एक निर्धारित प्रक्रिया आहे. या निर्धारित प्रक्रियेस काही निश्चित कालावधी लागतो.  
वरील प्रक्रियेनुसार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची तपासणी व अंतिम नोंद झाल्यानंतर संबंधित मृतदेह हा निर्देशित वैद्यकीय पद्धतीनुसार  वेष्ठनात पॅकबंद करणे गरजेचे असते. त्याच वेळी संबंधितांच्या नातेवाईकांना मृत्यूबाबत कळविणे देखील आवश्यक असते.‌ त्यानंतर नातेवाईकांकडूनही मृतदेह ताब्यात घेतल्या जायला हवा. परंतु काही वेळा नातेवाईकांकडून लगेच प्रतिसाद मिळत नाही. त्यातही वेळ जातो. या व्यवहार्य अडचणी आहेत. अशा अडचणी उदभवल्या नाही आणि सर्व सुलभ झाले तरीही या सर्व प्रक्रियेस किमान १ तासाचा कालावधी लागतो. तसेच ही प्रक्रिया संबंधित रुग्ण उपचारासाठी ज्या खाटेवर असेल, त्याच खाटेवर करणे संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. वरील नुसार प्रक्रिया करत असताना वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक ती सर्व दक्षता काटेकोरपणे व नियमितपणे घेतली जात आहे. 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अत्यंत जबाबदारीने तपासले जाते व त्यांच्यावर आवश्‍यकतेनुसार यथायोग्य उपचार देखील केले जात आहेत. पालिकेची रुग्णालये ही सर्व जनतेसाठी खुली असल्याने या रुग्णालयांमध्ये गर्दी असणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय इतर कर्मचारी देखील गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन नियमितपणे रुग्णसेवा देत असतात. रुग्णांची गर्दी अधिक असल्यास ते विनातक्रार अधिक वेळेपर्यंत रुग्णसेवा देत असतात. सध्याच्या ‘कोरोनाच्या काळात तर महापालिकेच्या रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी हे आपल्या घरी न जाता रुग्णालयात किंवा रुग्णालयाच्या जवळपास ज्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी राहत आहेत. यानुसार रुग्णसेवा करत असताना अनेकांनी तर गेल्या कित्येक दिवसात आपल्या कुटुंबियांची – मुलाबाळांची भेट देखील घेतलेली नाही. अशा परिस्थितीत या प्रकारचे व्हिडिओ प्रसारीत झाल्यामुळे केवळ त्यांच्याच मनोबलावर नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्या मनोबलावरदेखील याचा मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाबही बृहन्मुंबई महापालिकेने अधोरेखित केली आहे.