मुंबई महापालिकेच्या ४०० गटांनी २ दिवसांमध्ये ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे केले सर्वेक्षण

मुंबई: कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कोरोनाचा अधिक धोका संभवू शकतो, अशा ज्येष्ठ नागरिकांचे

मुंबई: कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कोरोनाचा अधिक धोका संभवू शकतो, अशा ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेने २६ एप्रिलपासून हाती घेतले असून यासाठी ४०० चमू(गट) कार्यरत आहेत. यानुसार आतापर्यंत ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहे. तर यापैकी १०४ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. याचाच अर्थ ‘कोमाॅर्बिड’ गटातील सुमारे २.५ टक्के नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी आढळून आले आहे. या ज्येष्ठ नागरिकांना ‘प्राणवायू उपचार पद्धती’ अर्थात ‘ऑक्सिजन थेरपी’ देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नाॅन‌ कोविड’ रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे.यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांना अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड विषयक आजार, अनियंत्रित दमा यासारख्या बाबी आहेत, त्यांना ‘कोरोना’ या आजाराचा अधिक धोका संभवतो असे निदर्शनास आले आहे. यानुसार ‘कोरोना कोविड १९’ या आजाराचा संसर्ग व धोका याची अधिक शक्यता असणाऱ्या व्यक्तींचा समावेश ‘कोमाॅर्बिड’ गटात करण्यात येतो.याच ‘कोमाॅर्बिड’ गटातील ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी ही ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांच्या बाबतीत या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. ही बाब लक्षात घेऊन अशा व्यक्तींना ‘प्राणवायू उपचार पद्धती’ देण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात घेतला होता. त्यानुसार सदर कार्यवाही आता सुरू करण्यात आली आहे.प्राधान्याने आव्हानात्मक परिसरात करण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या या सर्वेक्षणादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना बाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचार देखील करण्यात येत आहेत. 

वरील तपशीलानुसार सध्या सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत महत्त्वाचे काही मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांच्या (हेल्थ पोस्ट) परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.या सर्वेक्षणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय एका चमूचे गठन करण्यात आले असून त्यांच्याद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या चमूमध्ये २ ‘कम्युनिटी हेल्थ वर्कर’ वा ‘आशा वर्कर’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गठित  चमू ही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी भेटी देऊन ज्येष्ठ नागरिकांची माहिती गोळा करत आहेत.  विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाशी संबंधित विकार, दमा, मूत्रपिंडविकार, कर्करोग आदी आजार इत्यादी असल्यास त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. तसेच हे आजार अनियंत्रित स्वरूपाचे असल्यास किंवा अशा व्यक्तींना कोणतेही औषध उपचार सुरू नसल्यास त्यांना त्यांच्या घराजवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात यथायोग्य औषधोपचार सुरू करण्यासाठी पाठविले जात आहे.

√ अशा व्यक्तींच्या शरीरातील प्राणवायूची पातळी (oxygen level) ही ‘ऑक्सी मिटर’ यंत्राद्वारे मोजण्यात येत आहे. ही पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून आल्यास त्यांना तात्काळ निकटच्या ‘नाॅन‌ कोविड’ रुग्णालयात पुढील आवश्यक त्या उपचारांसाठी पाठविले जात आहे.