शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई सोडून बाहेर जाऊ नये, मुंबई महापालिकेच्या सूचना, सांगितलं हे कारण

मुंबईत शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा आणि मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करत आहेत. मात्र कोरोनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो आणि कोरोना नियंत्रणाच्या कामासाठी शिक्षकांची गरज लागू शकते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शक्यतो मुंबई सोडून बाहेर जाऊ नये, अशा सूचना पालिका प्रशासनानं दिल्या आहेत. 

    देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. अनेक राज्यांत कोरोनाचे नवे रुग्ण वाढण्याचं प्रमाण वाढत चाललंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतपर अदजूनही कोरोनाची लाट ओसरलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावला असला, तरी मुंबईत कोरोनाची टांगती तलवार अद्यापही कायम आहे.

    मुंबईत शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा आणि मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करत आहेत. मात्र कोरोनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो आणि कोरोना नियंत्रणाच्या कामासाठी शिक्षकांची गरज लागू शकते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शक्यतो मुंबई सोडून बाहेर जाऊ नये, अशा सूचना पालिका प्रशासनानं दिल्या आहेत.

    गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शिक्षकांवर कोरोनाबाबतच्या कामांची जबाबदारी देण्यात आली होती. नियंत्रण कक्षात काम करणे आणि अन्न वितरणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचं महत्त्वाचं काम शिक्षकांकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा गरज पडली, तर शिक्षक उपलब्ध असावेत, यासाठी मुंबई महापालिकेनं शिक्षकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नका, अशा सूचना केल्या आहेत.

    कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणं, आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन पुरवणं यासाठी पालिकेनं सर्व २४ वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केल्या आहेत. या कोरोनाच्या संकटकाळात पालिकेला शिक्षकांची मोठी मदत होत असल्याचं चित्र आहे.