रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने उचलली पाऊले, मुंबईत ३०० आयसीयू बेडची करणार तरतूद

रुग्णांना बेडच्या समस्या येऊ नयेत यासाठी मुंबई पालिकेने(BMC) आयसीयु बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये आयसीयुच्या ३०० खाटांची(300 ICU Beds) वाढ करणार आहे.

    मुंबई: मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने(Corona patients in Mumbai) रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू बेड अपुरे पडू लागल्याने रुग्णांची गैरसोय झाली. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना बेडच्या समस्या येऊ नयेत यासाठी मुंबई पालिकेने आयसीयु बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये आयसीयूच्या ३०० खाटांची वाढ करणार आहे.

    मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढला. रोज आढळणारी रुग्णसंख्या ११ हजारावर पोहचली. त्यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले होते. कडक निर्बंध आणि पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे सध्या रुग्णांची आकडेवारी घटते आहे. मात्र वाढलेल्या रुग्णांमुळे पालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेड्सचीही कमतरता भासू लागल्याने रुग्णांसमोर अडचणी आल्या. मात्र पालिकेने बेडस, ऑक्सिजन, आयसीयू खाटा उपलब्ध केल्याने काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला.

    पालिकेने आयसीयू बेडची संख्या वाढवून २ हजार ९०६ आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या १ हजार ४९१ केली आहे. यानंतरही रुग्णांना आयसीयु बेड घेण्यास अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता, आता पालिका आयसीयु बेडच्या ३०० खाटांची वाढ करणार आहे. येत्या काही दिवसांत विविध रुग्णालयांमध्ये या आयसीयु बेडची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

    विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये ५०, नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० बेड्स एक ते दोन दिवसात सुरू होणार आहेत. उर्वरित बेड रूग्णांच्या मागणीनुसार इतर कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. शहरात उभारल्या जाणाऱ्या तीन नवीन जम्बो कोविड केंद्रांमध्ये आयसीयूच्या ६०० हून अधिक बेड्स उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.