लसीकरण नोंदणीचा सावळागोंधळ टाळण्यासाठी मुंबई पालिकेने लढवली आयडियाची कल्पना, वेबसाईट आणि ‘या’ हेल्पलाईन नंबरवर मिळणार माहिती

मुंबई पालिकेने(BMC) अखेर लसीकरण वेळ (Vaccination Time And Registration) नोंदणीसाठी आजपासून पालिकेच्या अधिकृत वेबसाईटसह पालिकेच्या १९१६ हेल्पलाईन क्रमांकासह समाजमाध्यमांवरदेखील माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई: मुंबईत पालिकेच्या(BMC) लसीकरण केंद्रांवरील(Vaccination Center) लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पालिकेकडून लसीकरण नोंदणीची वेळ सायंकाळी उशीरा केवळ ट्विटरवरुन प्रसिद्ध केली जात होती. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना त्याविषयी नेमकी माहिती कळत नसल्याने नाराजी उमटत होती.

    हा गोंधळ टाळण्यासाठी मुंबई पालिकेने(BMC) अखेर लसीकरण वेळ (Vaccination Time And Registration) नोंदणीसाठी आजपासून पालिकेच्या अधिकृत वेबसाईटसह पालिकेच्या १९१६ हेल्पलाईन क्रमांकासह समाजमाध्यमांवरदेखील माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

    लशींचा तुटवडा आणि लस घेण्यासाठी वेळदेखील समजत नसल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. ही तक्रार लक्षात येताच मुंबई पालिकेने तातडीने लसीकरण वेळ सर्वांना समजेल यादृष्टीने निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून पालिकेच्या mcgm.gov.in अधिकृत वेबसाइटसह सोशल मीडिया आणि पालिकेच्या १९१६ हेल्पलाइन क्रमांकावर लसीकरण नोंदणी आणि इतर संबंधित माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

    आतापर्यंत ट्विटरवर लसीकरणाची माहिती दिली जात होती. पण ती सर्वांनाच उपलब्ध होत नसल्याने पालिकेने नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे, मुंबईकरांना लसीकरणासाठी नोंदणीसाठी इतरही पर्याय उपलब्ध झाल्याचे पालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.