मुंबई महापालिकेचे १६०० कर्मचारी कोरोनाबाधित पण महापालिकेत ५३ हजार पदे रिक्त असल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

मुंबई: मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १६०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना युद्धात ४० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही म्युनिसिपल मजूर

 मुंबई: मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १६०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना युद्धात ४० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही म्युनिसिपल मजूर युनियनने केला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नाहक बदनामी होत असल्याच्या प्रकरणी युनियनने आयुक्तांना पत्र लिहिले असून, बदनामी करणाऱ्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.    

गेल्या काही दिवसांत महापालिका रुग्णालयांतील स्थितीबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच रुग्णालयांतील व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. डॉक्टरांकडून दावा करण्यात येतो हे की रुग्णलायांमध्ये नर्सेस, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी उपस्थित नाहीत. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या युनियनने आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात महापालिकेतील ५३ हजार पदे रिक्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मुंबई पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने ते ड्युटीवर येऊ शकत नाहीत. काही कर्मचारी हे निवृत्तीला आले आहेत, काहीजण आजारी आहेत तर काहीजण दिव्यांग असल्याने त्यांना ड्युटीवर बोलावण्यात येत नाही. यासह अन्य काही कारणांमुळेही कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जाणवते आहे.  अशा स्थितीत उरलेले कर्मचारी हे जीव धोक्यात टाकून काम करत असताना, त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची बदनामी करण्यात येत असल्याबाबत युनियनने नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयांतील काही जण जाणीवपूर्वक ही बदनामी करत असल्याचे यपनियनचे म्हणणे असून, त्यांच्यावर करावाईची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. युनियनचे प्रदीप नारकर यांच्या सांगितले की मनुष्यबळ नसल्याचे नाकारता येत नाही, तरीही आम्ही कर्मचारी कोरोना संकटाशी लढू. मात्र कर्मचाऱ्यांची होणारी बदनामी आम्ही सहन करणार नाही.