५,५०० बेड्स चार जम्बो सेंटर्समध्ये तयार; ७० टक्के ऑक्सिजन बेड तर १,००० आयसीयू उपलब्ध

मुंबईत कोरोनाची पहिली व दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते आहे. या तिसऱ्या लाटेचा प्रकार कसा असेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या लाटेत रुग्ण संख्येत वाढ झाली तर त्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, कोणतीही कमतरता भासू नये यासाठी पालिका तयारीला लागली आहे.

  मुंबई : मुंबईत कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले असले तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. चार जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून या ठिकाणी ५,५०० खाटा उपलब्ध केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या चारही जम्बो कोविड सेंटरमध्ये ७० टक्के खाटा ऑक्सिजन तर १ हजार आयसीयू खाटा उपलब्ध असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे.

  मुंबईत कोरोनाची पहिली व दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते आहे. या तिसऱ्या लाटेचा प्रकार कसा असेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या लाटेत रुग्ण संख्येत वाढ झाली तर त्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, कोणतीही कमतरता भासू नये यासाठी पालिका तयारीला लागली आहे. कांजूर, मालाड, महालक्ष्मी व भायखळा अशा चार ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत.

  या चारही जम्बो कोविड सेंटरमध्ये तब्बल ५,५०० खाटा उपलब्ध असणार आहेत. तर ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी चारही जम्बो कोविड सेंटरमधील ७० टक्के खाटा ऑक्सिजनचे असून एक हजार खाटा आयसीयूचे असणार आहे.

  सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये पॉवर सप्लाय असलेल्या ठिकाणी युपीएस सिस्टिम कार्यान्वित केली असून पॉवर बॅकअपमध्ये असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन पुरवठा होतो, त्या ठिकाणी ऑक्सिजनचा बॅकअप म्हणजे जम्बो सिलिंडर व टरबो सिलिंडर, डिझेलची व्यवस्था करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

  गेल्या वर्षी बीकेसी जंम्बो कोविड सेंटरमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा प्रकार घडला होता. तो लक्षात घेता यावेळी जम्बो कोविड सेंटर परिसरात पाण्याचा निचरा करणारे पंप बसवण्यात आले आहेत.

  जम्बो कोविड सेंटरमध्ये पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास त्वरित उपाययोजना करण्यासाठी खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.