रस्त्यांवरील खड्डे बुजवता बुजवता BMC च्या तिजोरीला पडणार खड्डा; भाजपा आक्रमक

मुंबई शहरात कितीतरी पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची कामे सल्लागाराविना अभियंत्यांनी यापूर्वी समाधानकारकरित्या पूर्ण केलेली आहेत. मात्र, सदर कामासाठी कामाच्या किंमतीच्या अडीच टक्के म्हणजेच ५० लाख रुपयांच्या सल्लागार शुल्काची उधळणूक कश्यासाठी? आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले वास्तुविशारद हे ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ आहेत. मुळात पदपथाच्या कामासाठी 'हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार' कश्यासाठी? पदपथ ही वास्तू हेरिटेज आहे का? अशीही टीका गटनेते शिंदे यांनी केली.

  मुंबई : महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ते, उद्याने आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या विकासकामांना कात्री लावली असतानाच काही विशिष्ट भागात ठराविक पदपथाच्या सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी कश्यासाठी? पालिकेच्या तिजोरीवर अनाठायी भार कशासाठी, असा सवाल भाजपाने केला आहे. या अवाजवी, अनावश्यक उधळपट्टीबद्दल स्थायी समितीत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले.

  पश्चिम उपनगरातील मालाड पी दक्षिण विभागातील एम. जी. रस्त्यालगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांची आणि बांद्रा विभागातील आर. के. पी. आणि संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्टयांची आणि पदपथांची मास्टीक अस्फाल्ट व सिमेंट काँक्रीटमध्ये अनुक्रमे सुधारणा व सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला होता.

  पदपथाच्या सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण, पर्यटन, पालकमंत्री यांना बैठक घेऊन नंतर पुन्हा आढावा बैठक घ्यावी लागते? मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत निर्देश दिले असून हे काम महापालिका आयुक्त करत आहेत की, राज्य सरकार असाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे पालिकेतील भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. या भागातील रस्ते मुख्य किंवा हमरस्ते नाहीत. यापूर्वी मुंबई शहरात कित्येक पदपथांची कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. जेव्हा मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सदर कामासाठी बैठका घेतात तेव्हा त्या स्तरावर महापालिकेच्या तिजोरीत हात घालण्यापूर्वी सीएसआर फंडातून हे काम करणे शक्य झाले नसते का ? असाही प्रश्न गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला.

  सल्लागार शुल्क ५० लाख रुपये

  मुंबई शहरात कितीतरी पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची कामे सल्लागाराविना अभियंत्यांनी यापूर्वी समाधानकारकरित्या पूर्ण केलेली आहेत. मात्र, सदर कामासाठी कामाच्या किंमतीच्या अडीच टक्के म्हणजेच ५० लाख रुपयांच्या सल्लागार शुल्काची उधळणूक कश्यासाठी? आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले वास्तुविशारद हे ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ आहेत. मुळात पदपथाच्या कामासाठी ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ कश्यासाठी? पदपथ ही वास्तू हेरिटेज आहे का? अशीही टीका गटनेते शिंदे यांनी केली.

  कंत्राटदारांसाठी तिजोरी खुली

  या रस्त्यांवर यापूर्वी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. दहा वर्षांपूर्वी वर्ष २००८ मध्ये पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची सुधारणा करताना तत्कालीन आयुक्त जयराज फाटक यांनी पेव्हर ब्लॉकचे जोरदार समर्थन करीत त्याचा वापर सुरू केला. त्यावेळी तत्कालीन भाजपाचे गटनेते भालचंद्र शिरसाट यांनी त्यांच्यावर ‘कंत्राटदाराचे फेव्हर ब्लॉक’ अशी टीका करत जोरदार विरोध केला होता. वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी पेव्हर ब्लॉकच्या वापरावर बंदी आणली आणि ते उखडून पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांचे सिमेंट काँक्रीट मास्टिक अस्फाल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी कंत्राटदारांना पुन्हा तिजोरीची दारे उघडून दिल्याची टीका गटनेते शिंदे यांनी केली आहे.

  तिजोरीला खड्डा पडणार

  गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मुंबईभर रस्त्यांवर, रस्त्याच्या लगतचा पट्टा, पदपथावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना पदपथ सुशोभिकरणाचे प्रस्ताव महापालिका तिजोरीत मोठा खड्डा पाडल्याशिवाय राहणार नाहीत अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.