एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित, दीपिकाची माजी मॅनेजर आणि भारती सिंहला मदत केल्याचा ठपका

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने आपवल्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह, तिचा पती हर्ष आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाश यांना मदत केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून, या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात येणार आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी करिष्मा प्रकाश आणि भारतीसिंह प्रकरणात तपास अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भारती आणि तिचा पती हर्ष यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी एकही एनसीबीचा अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हता, त्यामुळे तपास यंत्रणांची बाजू न ऐकताच, न्यायालयाला भारती आणि हर्षला जामीन मंजूर करावा लागला. करिश्मा प्रकाशला मिळालेल्या अटकपूर्व जामिनावेळीही असाच प्रकार घडला असल्याचा संशय एनसीबीला आहे.

या दोन्ही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांबरोबरच सरकारी वकिलांवरही एनसीबीचा संशय असल्याचे वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांप्रमाणेच सरकारी वकीलही दोन्ही प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर नसल्याची माहिती आहे.

एनसीबीने भारतीच्या घरी आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यात ८६ ग्रॅमहन अधिक गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर भारती आणि तीचा पती हर्ष लिंबाचिया यांना ताब्यात घेण्यात आले होते. भारतीनेही चौकशीत हर्षसोबत गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. २२ नोव्हेंबरला भारतीला तर २३ नोव्हेंबरला हर्षला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, २४ नोव्हेंबरला या दोघांनाही जामीन मंजूर झाला. एनसीबीने या जामिनाविरोधात एनडीपीसी कोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दीपिकाची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीही एनसीबीने नोव्हेंबरमध्ये धाड टाकली होती. तिच्या घरातूनही काही ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. करिश्माच्या घरातून सीबीडी ऑईलच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. अटक होणार हे लक्षात येताच करिश्माने न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयात तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही करिश्माला देण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात करिश्मा तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप एनसीबीने केला होता. करिश्माची कोठडी मिळावी त्याद्वारे तिची चौकशी करण्यात येईल अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात करिश्माच्या अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि चौकशी अधिकारी कोर्टात गैरहजर राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे करिश्माच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.