चोरून न्यायला बॉलिवूड म्हणजे काही पर्स नव्हे, योगींचा उद्धव ठाकरेंना टोला

हा महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशचा प्रश्न नसून खुल्या स्पर्धेचा मुद्दा असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. मुंबईतून बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेलं जात असल्याच्या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलंय.

चोरून न्यायला बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही, असं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

हा महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशचा प्रश्न नसून खुल्या स्पर्धेचा मुद्दा असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. मुंबईतून बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेलं जात असल्याच्या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलंय. एखादी इंडस्ट्री काही तात्कालिक कारणांमुळे त्या-त्या ठिकाणी उभी राहत असते. मात्र देशात लोकशाही पद्धतीनं खुली स्पर्धा असणं गरजेचं आहे. जर उत्तर प्रदेशला येण्यात इंडस्ट्रीला अधिक सोय आणि फायदा वाटत असेल, तर त्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे असायला हवं, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची आपण घेतलेली भेट ही उत्तर प्रदेशातील चित्रपटसृष्टीची ब्लू प्रिंट तयार करण्याच्या दृष्टीने घेतली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं, हा त्यामागचा हेतू होता. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना असुरक्षित वाटण्याचे काहीच कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकेकाळी दक्षिणेतील चित्रपट सृष्टी आणि बॉलिवूड यांच्यातील स्पर्धेबाबत बोलले जात असे. मात्र दोन्ही इंडस्ट्री आपापल्या पद्धतीने बहरत गेल्या. नवी इंडस्ट्री ही अगोदरच्या इंडस्ट्रीला मारक ठरेल, असे दरवेळी होत नाही. त्यामुळे स्पर्धा वाढत जाऊन प्रेक्षकांना अधिक चांगले पर्याय मिळतील, असा सूर उत्तर प्रदेशच्या चित्रपटसृष्टीचे समर्थन करणाऱ्यांमधून ऐकू येत आहे.