अनिल देशमुख यांच्या दोन्ही PA ना ईडीकडून अटक, आज न्यायालयात करणार हजर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    नागपुरातील निवासस्थानी छापेमारी

    अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.

    सचिन वाझेचाही तुरुंगातून जबाब

    दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

    काय आहे प्रकरण ?

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.

    अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

    या कारवाई संदर्भात आता स्वत: अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. यापुढेही ईडीला चौकशीत सहकार्य करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.