दहावी, बारावी निकालावर बहिष्कार; शिक्षक संघटनांचा सरकारला इशारा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 100 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्याने मुंबईतील शिक्षक बसने तर मुंबईबाहेरील शिक्षकांना खासगी वाहनाने शाळेत यावे लागत आहे. परिणामी शिक्षकांना प्रचंड आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकार रेल्वे प्रवासाची मुभा देणार नसेल तर दहावी, बारावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याबरोबरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.

  मुंबई :  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 100 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्याने मुंबईतील शिक्षक बसने तर मुंबईबाहेरील शिक्षकांना खासगी वाहनाने शाळेत यावे लागत आहे. परिणामी शिक्षकांना प्रचंड आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकार रेल्वे प्रवासाची मुभा देणार नसेल तर दहावी, बारावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याबरोबरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.

  राज्य मंडळाकडून जुलैमध्ये दहावी व बारावीचे निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसाार दहावी व बारावीच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेमध्ये 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील शाळांमधील बहुतांश शिक्षक हे वसई, विरार, मिरा-भाईंदर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा यासारख्या ठिकाणी राहत आहेत. या परिसरातून थेट बस सेवा मुंबईमध्ये येण्यासाठी नाही. तसेच खासगी वाहनाने यायचे झाल्यास त्यासाठी दररोज किमान हजार ते बाराशे रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे प्रवासासाठी रेल्वेशिवाय पर्याय नाही.

  शिक्षकांना लोकलद्वारे प्रवासाबाबत सूचना दिल्याचे शिक्षण संचालयानालयाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे तिकिट खिडकीवरील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे निकालाचे काम करायचे असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना तिकिट किंवा पास दिला जात नसल्याने शाळेत पोहोचण्यासाठी हजार ते बाराशे रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना तातडीने रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्यास दहावी, बारावी निकाल प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला आहे.

  निकालास उशीर झाल्यास याला सरकार जबाबदार असेल, असेही शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितले. तसेच शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.

  सरकारकडून शिक्षक संघटनांची दिशाभूल

  शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी विविध शिक्षक संघटनांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेत आहेत. मात्र शिक्षक संघटनांना शासनाकडून वेगवेगळे उत्तर देऊन त्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक भारतीने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची बुधवारी भेट घेतली असता त्यांना मुंबई तिसर्‍या स्तरातून दुसर्‍या स्तरात जात नाही, तोपर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली असता त्यांनी यांसदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, गुरुवारी यावर निर्णय होईल, असे सांगितले आहे.