काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात देगलूर पोटनिवडणुकीच्या उमेदवाराबाबत मंथन; केंद्रीय निवड समिती अंतिम निर्णय घेणार  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवला असून तिथे उमेदवाराच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

    मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांबाबत आज प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते.
    नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांची यादी पाठवली. आजच्या बैठकीत या यादीतील नावांवर चर्चा झाली.  यामध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर, भीमराव मरीबा क्षीरसागर, मंगेश नारायण कदम, राजाराम चांदोबा कांबळे, गंगाधर सोंडारे, गणेश कांबळे आदींचा समावेश असून, आजच्या बैठकीत या सहा नावांवर चर्चा झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवला असून तिथे उमेदवाराच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून काँग्रेसने निश्चित केलेला उमेदवार रिंगणात उतरणार आहे.