काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; आरोपी फरार, वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सायन कोळीवाडा परिसरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वसंत कुमार देवेंद्र यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि फरार झाले. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    मुंबई : सायन कोळीवाडा परिसरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वसंत कुमार देवेंद्र यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि फरार झाले. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    वडाळा पूर्वेतील कोकरी आगार स्थित न्यू म्हाडा कॉलनीत ३१ वर्षीय वसंत कुमार आरुमुगम देवेंद्र आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, तो सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग घ्यायचा. काेरोना महामारीदरम्यान लोकांना मदतही खूप केली. रविवारी रात्री १०.३० च्या दरम्यान वसंत कुमार आपल्या पत्नीसह बिल्डिंगच्या कम्पाऊंडमध्ये बसले होते. यादरम्यान दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतरही हल्लेखोरांनी कित्येक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात वसंत कुमार पडले होते. या घटनेनंतर पत्नीने आवाज उठवला. तसेच हल्लेखोरांचा विरोध केला, त्यामुळे हल्लेखोर तिच्याही मागे धावले. परंतु, मोठ्या शर्थीने तिने आपले प्राण वाचवले.

    वसंत कुमार यांच्या हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोर फरार झाले आहेत. दरम्यान, काही जणांनी जखमी अवस्थेत वसंत कुमार यांनी शीव रुग्णालयात दाखल केले, परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींची ओळख पटली आहे.

    हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्च करत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, जुन्या वादातून वसंत कुमार यांची हत्या झाली असावी. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. त्या आधारावर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.