…पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे – आमदार गोपीचंद पडळकर यांची सूचक टीका

पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार..., असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे.

    मुंबई: प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असल्याचे असे म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर(bjp gopichand padalkar) यांनी त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
    ‘पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार…, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. मात्र, या ट्विटसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि एका कार्यकर्त्याचा फोटो पडळकर यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे पडळकर यांचा रोख रोहित पवार यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे.

    गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडळकर सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना, शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत असे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसे मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, ‘रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले होते.


    दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी गाडीवरील दगडफेकीवर प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.