आता राज्यात मंत्रीमंडळात फेरबदल? संजय राठोड, प्रणिती शिंदेंच्या नावांची चर्चा

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार अशी चर्चा आहे. पण त्यांच्या कमबॅकला भाजपने जोरदार विरोध केला आहे.  

    मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणि मंत्रिमंडळात फेरबदल लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले माजी वन मंत्री शिवसेनेचे संजय राठोड आणि काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीच्याही नेत्यांची वर्णी नव्या फेरबदलात लागण्याची शक्यता आहे.

    दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार अशी चर्चा आहे. पण त्यांच्या कमबॅकला भाजपने जोरदार विरोध केला आहे.

    तर आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांना राज्यमंत्री पद मिळू शकते. नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा सातत्याने निवडून येत आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी व्यक्त केला आहे. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असे संजय राठोड यांनी सूचक वक्तव्य केले आहे.