ऑफलाईन परीक्षेसंदर्भात राबविणार मोहीम; शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा

सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. बालभवनात गुरुवारी झालेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीत त्या बोलत होत्या.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

  राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याने अनेक पालकांनी शासनाकडे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्याची विनंती केली आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याने पालकांनी चिंता करु नये, असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

  तसेच, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. बालभवनात गुरुवारी झालेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीत त्या बोलत होत्या.

  लेखीनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दिली तरी चालेल

  कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रकानुसार देणे शक्य न झाल्यास त्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेनंतर घेण्यात येतील व या परीक्षांना वेगळे शुल्क घेऊ नये, अशा सूचनाही गायकवाड यांनी दिल्या. शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे.

  सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असेही गायकवाड म्हणाल्या. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, एसएससी मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, एसईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय

  विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सूचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टिकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

  पूर्वतयारीसाठी कार्यक्रम

  शासनामार्फत सह्याद्री वाहिनीवर व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच ‘एफएक्यु’ देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

  वेगळे शुल्क आकारले जाऊ नये

  दरम्यान, या बैठकीमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. कंटेन्मेंट झोन, लॉकडाऊन अथवा कोरोना लागण इत्यादी कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार नाही, त्यांच्याबाबत शासनाने विचार करावा. तसेच, यासाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी पालक संघटनांनी केली.