कर्करोग रुग्णांची कोरोनावर मात – वरळीतील एनएससीआय केंद्रात सुरु होते उपचार

मुंबई : परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या १७८ रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले असून त्यापैकी १२६

 मुंबई :  परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या १७८ रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले असून त्यापैकी १२६ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नसून फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हे दुर्मिळ असे उदाहरण म्हणावे लागेल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाचा सामना करताना ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी पालिका आरोग्य विभागकड़ून घेण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशा रुग्णांसाठी पालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र संयंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले आहे.दरम्यान, जगभरात कर्करुग्णांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास त्यांतील मृत्युंचे प्रमाण हे तब्बल ५० टक्के इतके आहे. कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार,कोरोनाची बाधा झालेल्या कर्करोग ग्रस्तांना सर्वसाधारण कोरोना उपचार केंद्रांमध्ये एकत्रित ठेवता येत नाही, त्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते.या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.मुंबईत परळ येथील  टाटा रुग्णालयात देशभरातून कर्करोगांनी ग्रस्त  उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिका व टाटा रुग्णालय एकत्रित काम करत आहेत. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या २ वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते ७७ वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे.
 
देशभरातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण ५० वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण १७८ कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. यापैकी १२६ जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. अजुन ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली असल्याचा पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाबाधित कर्करुग्णांच्या १० नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. तर ४ नातेवाईकांवर सध्या उपचार सुरु आहेत.