Cases of atrocities and domestic violence; MNS Navi Mumbai city president Gajajan Kale's pre-arrest bail today

गजानन यांचे परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते. त्यांना येणाऱ्या फोन व मेसेजवरुन माझ्या ते लक्षात आले होते. त्यांना वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत, तू यात लक्ष घालू नकोस, असे सांगून माझ्यासोबत भांडण करायचे, असेही पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.

    मुंबई : पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या काळे यांच्या अटकपूर्व जामीनावरील याचिकेवरील मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून तो आज (बुधवारी) जाहीर करण्याची शक्यता आहे.

    मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीने केला आहे. आमचे लग्न २००८ झाल्यानंतर गजानन किरकोळ कारणांवरून भांडण करु लागले. माझी जात व माझ्या सावळ्या रंगावरुन बोलू लागले, असेही त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

    गजानन यांचे परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते. त्यांना येणाऱ्या फोन व मेसेजवरुन माझ्या ते लक्षात आले होते. त्यांना वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत, तू यात लक्ष घालू नकोस, असे सांगून माझ्यासोबत भांडण करायचे, असेही पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.

    याप्रकऱणी अटक होऊ नये, म्हणून काळे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने काळेंचा अर्ज फेटाळून लावला. त्या निर्णयाला काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपीलमार्फत आव्हान दिले आहे. त्यावर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे आणि अर्थहीन असून हा निव्वळ पती-पत्नी यांच्यातील बेबनाव असल्याचा युक्तिवाद काळे यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला तसेच काळेंना तूर्तास अटक न करण्याचे निर्देशही न्यायालयाने कायम ठेवले आहेत.