disha salian

मुंबई: दिशा सालियनच्या(disha salian) मृत्यूची मुंबई पोलिसांनी अपमृत्यू म्हणून नोंद केली आहे. दिशा सालीयन यांनी आत्महत्या केल्याचे मुंबई पोलीस सांगत असले तरी दिशा सालियन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दिशा सालियन यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आपली मागणी असून त्याबाबतचे पत्र गृहमंत्री अमित शहा यांना आपण पाठवत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी आज जाहीर केले.

दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंह राजपूत(sushant singh rajput) यांच्या माजी व्यवस्थापक होत्या. त्यांनी मालाडमध्ये त्यांच्या निवासस्थानी पार्टी दिली होती मग त्या त्याच रात्री आत्महत्या का करतील ? पार्टी झाली त्या रात्री दिशावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय आहे. दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाल्यानंतर त्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो ? मुंबई पोलीस खून झाल्यानंतर लगेच आरोपीपर्यंत पोहचत असतात. मात्र दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याची शंका येते.

एका महिलेची हत्या ही आत्महत्या दाखवून प्रकरण दडपले जाणार असल्याची दिशा मृत्यू प्रकरणी शंका येते. मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, दिशा मृत्यू प्रकरणी कोणीही तक्रारदार नाही त्यामुळे दिशा मृत्यूप्रकरणी हत्या असावी याबाबत मुंबई पोलिसांचा तपास पुढे गेला नाही. खरे म्हणजे मृतदेह सापडल्यानंतर मुंबई पोलीस सुगावा काढत गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. या प्रकरणात मात्र मुंबई पोलीस तक्रारदराची का वाट पाहात आहेत? कोणी तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई पोलिसांनी दिशा सालीयनची हत्या झाली असावी का या शक्यतेच्या दृष्टीने स्वतःहून तपास करणे आवश्यक होते. दिशा सालियनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर  सुशांतसिंह राजपूतही अस्वस्थ झाला होता. दिशा सालियनच्या मृत्यूचा सुशांतसिंहच्या मृत्यूशी काहीतरी सबंध असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आपली मागणी असून या मागणीचे पत्र आपण लवकरच गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचे  रामदास आठवले म्हणाले.