Celebrity hair stylist Suraj Godambe arrested; NCB's crackdown

मुंबई : ड्रग्ज तस्करांचे बॉलीवूड कनेक्शन पुन्हा उघडकीस आले असून एनसीबीच्या धाडसत्रात आता मोठ्या प्रोडक्शन हॉऊसच्या मेकअप डिपार्टमेंटमचा प्रमुख तसेच बॉलीवूडमधील हेअर स्टाइलिस्ट सुरज गोडंबेला ड्रग्जची खरेदी करताना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीने सुरू केलेली धडक कारवाई अद्याप सुरूच आहे. एनसीबीने बुधवारी मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असतानाच गुरुवारी पुन्हा धडक कारवाई केली. पथकाने अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा येथून सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला अटक केली. तर त्याच्यासोबत एका रिक्षाचालकालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोकेनची १६ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

गुरूवारी बॉलीवूडला लक्ष्य करत एनसीबीने हेअर स्टाइलिस्ट गोडंबे याला ११ ग्रॅम कोकेनच्या १६ इमप्िाल्ससह अटक केली आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे दीड लाख आहे. सुरजकडून एक डायरी जप्त केली असून या डायरीमध्ये बॉलीवूडमधील नामांकित कलाकारांची नावे आहेत. यातील दोन बडे ‘स्टार’ एनसीबीच्या रडारवर असून त्यांच्या चौकशीसाठी एनसीबी समन्स धाडू शकते. सुरज ज्यांना ड्रग्ज पुरवठा करायचा, त्यांची नावे या डायरीमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

एनसीबीचे झोनल संचालक समीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सातत्याने कारवाई सुरू आहे. विशेषत: बॉलीवूडमध्ये पसरलेले ड्रग्जचे जाळे मुळासकट उपटून काढण्यासाठी एनसीबी मोठी कारवाई करत आहे. सुरज बॉलीवूडच्या नामांकित प्रोडक्शन हाऊसच्या मेकअप डिपार्टमेंटचा प्रमुखही आहे. त्याने केवळ एकाच सेलिब्रिटीजकडे नव्हे तर अनेक सेलिब्रिटीजकडे काम केले आहे. अनेक नामांकित स्टारसोबत त्याचे फोटो आहेत.

एनसीबी सुत्रांच्या मते, सुरज गोडंबे नायझेरियन इंटरनॅशनल ड्रग्ज सिंडिकेटशी संलग्न आहे. कोलंबिया आणि  साऊथ अमेरिकेतून कोकीनचा पुरवठा वेगवेगळ्या पार्सलच्या माध्यमातून दिल्लीत नायझेरियन ड्रग्स सप्लायरपर्यंत पोहचतो, त्यानंतर हे ड्रग्ज सप्लायर आपल्या ड्रग्ज पॅडलरच्याा माध्यमातून कोकीनचा पुरवठा देशातील आर्थिक राजधानी मुंबईत करतात. सुरज हा ड्रग्जची खरेदी करायचा आणि स्वत: खरेदी केल्यानंतर बॉलीवूडमधील बड्या कलाकारांना त्याची विक्री करायचा.

गुरूवारी अंधेरीतील लोखंडवाला परिसरात ड्रग्ज सप्लायर रिक्षाचालक लालचंद यादवकडून सुरज गोडंबे ड्रग्ज खरेदी करताना रंगेहात त्याला अटक केली. हा रिक्षाचालक नायझेरियन सिंडिकेटसाठी काम करत होता.

एनसीबीच्या मते, जप्त केलेले काेकीनला निळ्या, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाची स्टि्रप्स लावून पुरवठा केला जात होता. एनसीबी आणि सुरक्षा यंत्रणाला चकवा देण्यासाठी या स्टि्रप्सचा वापर व्हायचा तसेच वेगवेगळ्या दर्जाच्या ड्रग्जसाठी वेगवेगळ्या स्टि्रप्सचा वापर व्हायचा. दरम्यान, आता बॉलीवूडमधील कलाकारांच्या ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने एनसीबीचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सुरज कोणाकोणाला ड्रग्जचा पुरवठा करायचा, याची चौकशी असून असून आता पुन्हा बॉलीवूड इंडस्ट्रीच्या नंबर वन लिस्टर स्टार्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

१६ डिसेंबरपर्यंत एनसीबी कोठडी

मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरातून त्यांना अटक केली. दोघांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना कोर्टाने १६ डिसेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक केलेला सूरज याने बॉलिवूडमधील अव्वल सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन हाऊससाठी काम केल्याची माहिती मिळाली आहे. तर रिक्षाचालक यादव हा नायजेरियन टोळीसाठी काम करत असल्याचे समजते.