कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार : छगन भुजबळ

केंद्र सरकारबरोबर खासदार शरद पवार हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्थी करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल (Quintal) कांदा मुंबई बंदरात (Mumbai Port) अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)  यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी दिली आहे.

कांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी गरीब आहे. कोरोना काळात जे पिकवलं ते विकलं गेलं नाही. अशावेळी निर्यात बंदी केली. हजारो टन कांदा डॉकमध्ये पडून आहे. पंतप्रधान वांदे करत आहेत. इतर गोष्टीचे भाव वाढले तर निर्यात बंदी करतात का? कांदा फेकावा लागतो, सडतो, पण इथे कोणीही लक्ष देत नाही. मला याबाबत समजल्यावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आज ते पियुष गोयल यांना भेटले. कांदा निर्यातबंदी विरोधात सर्व खासदारांनी आवाज उठवला पाहिजे. असे छगन भुजबळ म्हणाले.

तसेच केंद्र सरकारबरोबर खासदार शरद पवार हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्थी करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.