प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

  मुंबई : कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईतही लसीकरण सुरू असून ज्येष्ठ नागरिक आणि विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य लवकर पूर्ण व्हावे, यासाठी खासगी रुग्णालयातील लसीकरण २४ तास सुरू ठेवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबईत दिवसाला १ लाख लाभार्थ्यांना लस देता येणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  मुंबईत १६ मार्चपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्षांमधील नागरिकांना लस दिली जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३० लाख इतकी आहे. मुंबईत खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

  या अनुषंगाने मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे खासगी रुग्णालयात २४ तास लसीकरण सुरू ठेवण्यास परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने तशी परवानगीही दिली आहे. या अनुषंगाने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लसीकरणाचा आढावा घेतला.

  मुंबईत २४ तास लसीकरण सुरू ठेवण्यासाठी तसेच रविवारीही लसीकरण सुरू ठेवता येईल, अशा सुधारणा कोविन अ‌ॅपमध्ये कराव्यात, अशी मागणी महापालिकेने पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. यावरही या बैठकीत चर्चा झाली. लसीकरण केंद्रे सुरू झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला.

  महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे ३० लाख आहे, ही बाब लक्षात घेतल्यास व दिवसाला १ लाख व्यक्तिंचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल असे आयुक्त म्हणाले.
  मुंबईत वय-वर्षे ६० पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तिंचे लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत ९ मार्चपर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय-वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तिंचेही लसीकरण करण्यात येत आहे.

  या गटातील १५ हजार २७२ व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले आहे. दोन्ही वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घ्यावयाचे आहे. आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा गंभीर आजार असलेल्या गटातील व्यक्तींचे वय ४४ वर्षे ३ महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.