कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, सीएसएमटी स्थानकात होणार सुरक्षित प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस (TC) यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने (central railway)  तिकिटांसह थर्मल तपासणी (thermal checking)  करणारे गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा (corona virus) प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस (TC) यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने (central railway)  तिकिटांसह थर्मल तपासणी (thermal checking)  करणारे गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) ते उभारण्यात येणार आहेत. याद्वारे अनावश्यक गर्दी आटोक्यात येईलच, शिवाय कोरोना संशयित असलेल्या प्रवाशांचे तातडीने विलगीकरण करण्यात येणार असून, अन्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

सीएसएमटी मेल-एक्स्प्रेससाठी प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर ५ फ्लॅप गेट (Flap gate) महिनाभरात कार्यान्वित होईल. सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यांच्या उपयुक्ततेचा अभ्यास केल्यानंतर अन्य स्थानकांत असे गेट उभारण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवेशद्वारावरील स्कॅनरवर तिकिटांवरील क्यूआर कोड (QR code)  ठेवल्यावर तिकिटाची वैधता स्कॅन (scan) होईल.

दुसऱ्या बाजूला थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे संबंधित प्रवाशांचे शारीरिक तापमान तपासण्यात येईल. या दोन्ही गोष्टी नियमानुसार असल्यावरच प्रवेशद्वार उघडेल आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे.