‘अमित शहांशी जवळीक साधून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं’ शिवसेनेच्या महिला आमदाराचा गंभीर आरोप

“पुण्यातील विधानसभेची सीट सुद्धा हिसकावून घेतली आणि तिथे आमदार झाले. चंद्रकांत दादांना महाराष्ट्रामध्ये कोण ओळखतं?" अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

  राज्यात सुरु झालेला शिवसेना विरुध्द भाजप वाद अजूनही शांत झालेला नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून नेहमीच काहीनकाही आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे पद अमित शहा यांच्या शिफारशींमुळे चंद्रकांत दादा पाटील यांना मिळाले आहे. अशी टीका करत शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

  काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

  मागील आठवड्यापर्यंत ‘आमचे शिवसेनेसोबत मनभेद नाहीत’ नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी स्वबळाची भाषा करत थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, “पाठीत खंजीर खुपसणारा चेहरा असे म्हटले की पूर्वी महाराष्ट्रात एकच चेहरा समोर यायचा, आता मात्र दुसरा चेहराही समोर येतो, तो कोणाचा?, उद्धव ठाकरेंचा.”

  चंद्रकांत पाटील यांच्या याच टीकेला उत्तर देताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, “पुण्यातील विधानसभेची सीट सुद्धा हिसकावून घेतली आणि तिथे आमदार झाले. चंद्रकांत दादांना महाराष्ट्रामध्ये कोण ओळखतं? आमच्या मातोश्रीवर आले होते तेव्हा काय बोलणं झालं हे त्यांनाही माहित आहे. कोणी पाठीत खंजीर खुपसला. ज्या चेहऱ्या बद्दल ते बोलत आहेत तोच चेहरा शिवसेनेसाठी अमित शहांचा आहे.”

  भारतीय जनता पार्टीने ईडी आणि सीबीआयच खेळणं केलं

  “भारतीय जनता पार्टीने ज्या केंद्रीय एजन्सी आहेत ईडी आणि सीबीआय यांचं खेळणं करून टाकलं. महाराष्ट्रात राज्यकारभार चालू नये यासाठी जी काही धरपकड चालू आहे. कुठलाही नोटीस नाही की कुठलाही अरेस्ट वॉरंट नाही तरी अनिल देशमुखांच्या जावई यांची भर रस्त्यात थांबून चौकशी सीबीआयने केली. अशाच प्रकारे याला त्याला उचलायचं काम सीबीआयकडून चालू आहे. शिवसेनेला ते तालिबान तालिबान म्हणतात पण ही तालिबानी प्रवृत्ती तर भारतीय जनता पार्टीमध्ये आहे.” अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.