दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजनात बदल, अगोदर होणार लेखी परीक्षा

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अगोदर लेखी परीक्षा घेण्यात यावी आणि त्यानंतर परिस्थिती पाहून प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात यावी, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलीय. लेखी परीक्षेनंतर जरी प्रॅक्टिकल परीक्षा घेतली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून वेगळं शुल्क आकारण्यात येऊ नये, असं त्यांनी म्हटलंय. 

    राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दहावीच्या लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहेत.

    सध्या राज्यातील औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लवकरच लॉकडाऊन होण्याची चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा कशी होणार, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. ज्या जिल्ह्यात लॉकडाऊन आहे, तिथल्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाहेर पडावं का, असा सवालही उपस्थित होतोय. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेचं नियोजन बदलण्याच्या सूचनाा दिल्यात.

    सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अगोदर लेखी परीक्षा घेण्यात यावी आणि त्यानंतर परिस्थिती पाहून प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात यावी, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलीय. लेखी परीक्षेनंतर जरी प्रॅक्टिकल परीक्षा घेतली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून वेगळं शुल्क आकारण्यात येऊ नये, असं त्यांनी म्हटलंय.

    वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीचे वर्ग आणखी काही दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र दहावीची आणि बारावीची परीक्षा पूर्वनियोजित असल्यामुळे ती ठरलेल्या वेळेत घेण्याचे नियोजन आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येऊ नयेत, यासाठीच केवळ प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.