करिश्मा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ ; करीश्मा-शक्ती यांच्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची साऱ्यांना उत्सुकता

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षी संभाजीनगरमधून आणलेल्या वाघांच्या जोडीची आता चांगलीच जवळीक वाढली आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षी संभाजीनगरमधून आणलेल्या वाघांच्या जोडीची आता चांगलीच जवळीक वाढली आहे. त्यामुळे मादीच्या मासिक ऋतुचक्रादरम्यान शक्ती नर आणि मादी करीश्मा यांना गर्भधारणेच्या दृष्टीने एकत्र आणले जात आहे. त्यामुळे शक्ती आणि करिश्माला एकमेकांबद्दल आकर्षण आणि रोमान्स वाढला आहे. त्यामुळे राणीबागेतील वाघांच्या जोडीकडून लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल, अशी अपेक्षा संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आणलेल्या शक्ती वाघाचे वय साडेतीन वर्षे असून मादीचे वय साडेचार वर्षे आहे. वाघ मादी दोन ते अडीच वर्षांनतर पिल्ले देण्यासाठी तयार होत असल्यामुळे सद्यस्थितीत राणी बागेतील नर आणि मादीही ब्रिडिंगसाठी सक्षम असल्याची माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.वाघ मादी करिश्मामध्ये अजून गर्भधारणा झाली नसली तरी आगामी काळात लवकरच होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. यामध्ये मादी तीन ते चार पिल्लांना जन्म देऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेच्या दृष्टीने सद्यस्थितीत मादीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मासिक ऋतुचक्र आल्यावर मादी काहीशी मवाळ होते. शिवाय नराकडे आकर्षित झाल्याची लक्षणे दाखवते. यावेळी नर-मादीला एकमेकांबद्दल प्रचंड आकर्षण वाढते. त्यामुळे प्रत्येक ऋतुचक्रादरम्यान नर-मादीला एकत्र आणले जात आहे