कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती नको – छात्रभारती संघटनेचे कुलगुरुंना पत्र

मुंबई : खाजगी व स्वायत्त कॉलेजांबरोबरच मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील प्रशासनाकडून पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क तातडीने भरण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर करण्यात येत असल्याचे तक्रारी येत

मुंबई : खाजगी व स्वायत्त कॉलेजांबरोबरच मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील प्रशासनाकडून पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क तातडीने भरण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर करण्यात येत असल्याचे तक्रारी येत आहेत. त्यामुळे ही सक्ती थांबवण्यात यावी, तसेच कॉलेजांनी शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करू नयेत, असे आदेश विद्यापीठाने द्यावेत, अशी मागणी छात्रभारती संघटनेने कुलगुरूंकडे पत्राद्वारे केली आहे.

मागील काही महिन्यापासून अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींना पूर्ण पगार मिळत नाहीत. यामुळे कुटुंबाची घडी विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कॉलेजांमध्ये नोटीस लावल्या आहेत. तसेच हे शुल्क तातडीने भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी मानसिक दबावाखाली आहेत.विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी रोहित ढाले यांनी पत्राद्वारे कुलगुरुंकडे केली आहे. शुल्क भरण्याची सक्ती टाळण्याबरोबरच छात्रभारतीने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रामध्ये कॉलेजांनी विद्यार्थ्यांना तात्काळ पैसे भरण्याची सक्ती करू नये, विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नसल्यास त्यांची प्रवेशादरम्यान अडवणूक न करता प्रवेश द्यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क ४ ते ५ टप्यात भरण्याची मुभा द्यावी आणि कुठलेही शुल्क वाढवू नये व शुल्कामध्ये सवलत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.