चेंबूर परिसरातील विलगीकरण केंद्राची ‌महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई :महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि 'परिमंडळ ५' साठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष अतिरिक्त आयुक्त

मुंबई : महापालिका आयुक्त  इकबाल सिंग चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि ‘परिमंडळ ५’ साठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष अतिरिक्त आयुक्त  प्राजक्ता लवंगारे यांनी आज ‘परिमंडळ पाच’ मधील ‘कोरोना कोविड १९’ विषयक सेवा सुविधांची व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व आढावा घेतला. या पाहणी दरम्यान त्यांनी चेंबूर परिसरातील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रातील सामुदायिक स्वयंपाक घरास (Community Kitchen) भेट देऊन, तेथील व्यवस्थेचीही पाहणी केली. त्याचबरोबर तेथील कामगारांशी संवाद साधण्यासह तिथे बनवलेल्या जेवणाचा दर्जाही त्यांनी स्वतः जाणून घेतला.

या पाहणी दरम्यान व आढावा बैठकीदरम्यान ‘परिमंडळ पाच’च्या परिसरातील सर्व सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण हे सातत्याने करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

तसेच परिसरातील खासगी डॉक्‍टरांच्या सेवा महापालिकेच्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात याव्यात, असेही निर्देश आजच्या पाहणी दौरा दरम्यान व आढावा बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘परिमंडळ ५’ मध्ये ‘एल’ विभागासह ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ या तीन विभागाचा समावेश आहे. या तीनही विभागांचा पाहणी दौरा व आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.  आजच्या आढावा बैठकीदरम्यान विभागस्तरीय आरोग्य अधिकार्‍यांच्या पथकाने घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण व वयोवृद्ध रुग्ण यांना शोधून त्यांना आवश्यक त्या उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘परिमंडळ पाच’ मध्ये असणाऱ्या महापालिकेच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये ‘कोरोना कोविड १९’ बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व इतर रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्याचे निर्देशही आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. या पाहणी दौऱ्यास व आढावा बैठकीस ‘परिमंडळ ५’चे सह आयुक्त  भा‌. रा. मराठे, परिमंडळ क्षेत्रातील तीनही प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त  वळंजू,  चौहान, व  द्विवेदी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.