घाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर

पालिकेच्या चेंबूरच्या एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण नसल्यामुळे महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या स्थापत्य समितीच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला होता. मात्र या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यास शिवसेना विलंब करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता.

  घाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या नव्या पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी झालेल्या स्थापत्य समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे नामकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारे भाजप तोंडघशी पडले असल्याचा टोला टेंबवलकर यांनी लगावला.
  पालिकेच्या चेंबूरच्या एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण नसल्यामुळे महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या स्थापत्य समितीच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला होता. मात्र या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यास शिवसेना विलंब करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता.
  यानंतर स्थापत्य समिती अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर यांच्यासह सदस्य आणि पालिका अधिका‍ऱ्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी या उड्डाणपुलाचे बांधकाम २५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.
  दरम्यान, आता या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर यांनी लेखी कळवल्याने आता या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. घाटकोपर-मानखुर्दला जोडणारा हा उड्डाणपूल शिवाजी नगर ते मोहिते पाटील जंक्शनपर्यंत २.९० किमीचा तयार करण्यात आला आहे. या उड्डाण पुलामुळे विभागातील शिवाजीनगर जंक्शन, बैगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राऊंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पालिकेने प्रथमच २४.२ मीटर सेगमेंट कास्टिंग तयार करून या पुलाचे बांधकाम केले आहे. या पुलामुळे नवी मुंबई, पनवेल, पुण्याला जाणा‍ऱ्या प्रवाशांची २५ मिनिटे वाचणार आहेत.
  या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी डिसेंबर २०२० मध्ये शिवसेनेकडून सर्वप्रथम नगरसेविका वैशाली शेवाळे यांच्यामार्फत करण्यात आली होती. मात्र भाजपने अलीकडेच पुलाला महाराजांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा केली.
  ‘सपा’चे गटनेते रईस शेख यांनी ‘सुलतानुल हिंद ख्वाजा गरीब नवाझ’ यांचे नाव देण्याची मागणी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी गुरूवारच्या बैठकीत मांडलेली उपसूचना बहुमताने मंजूर करून पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले. पुलाच्या नावावरून निर्माण झालेला वाद एकदाचा शमला.