छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही; चंद्रकांत पाटील यांचे मत

संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही, असे पाटील म्हणाले.

  कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. तूर्तास संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजी छत्रपती यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्दयावरून भाजपमध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

  हे आम्हाला मान्य नाही.

  चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षण लगेच मिळावे, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितले आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळाले पाहिजे, पण संघर्ष न करता मिळाले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. ७जुनला कोविड संपल्यावर बघू असे त्यांनी सांगितले आहे. हे आम्हाला मान्य नाही.

  संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा

  चंद्रकांत पाटील म्हणाले की, परवा मी पाच मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या आहेत. जो कोणीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करेल तो याच मागण्या पुढे रेटेल, संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भूमिका शरद पवार किंवा अजित पवारांची असेल तरी त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन असे मी आधीच सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

  संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

  ४ तारखेला याचिका दाखल कराच

  कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही, असे ते म्हणाले. येत्या ४ जून रोजी मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

  ४ तारखेला पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल न्यायालय सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे येत्या ४ तारखेला याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

  हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे

  संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही, असे पाटील म्हणाले.