आमदार रवींद्र वायकर यांची ‘या’ पदावर मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

आमदारांच्या मागण्या समजून घेत, या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई : शिवसेना आमदरांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. आमदारांच्या मागण्या समजून घेत, या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत जवळपास ४ तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेना आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून रवींद्र वायकर हे काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी याआधी युती सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे.