मुंबईतील नायर रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी केली १०० कोटींची घोषणा

नायर रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाली म्हणून नायर हॉस्पिटलला १०० कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली.

    मुंबई : राज्यात सर्वत्र मंदिरं बंद आहेत. मात्र कोरोनाकाळात खरे देव कोण हे सगळ्यांनी बघितलं. हॉस्पिटल म्हणजे मंदिर आणि डॉक्टर म्हणजे देव आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील नायर रुग्णालयाला(Nair Hospital Completed 100 Years) १०० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी(Chief Minister Uddhav Thakre) डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नायर रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाली म्हणून नायर हॉस्पिटलला १०० कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणादेखील उद्धव ठाकरे यांनी केली.

    मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    जिद्द असेल तर काही नसलं तरी करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.