मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनची घोषणा होणार?

राज्यात कोरोना विषाणूचा धोका हळूहळू वाढत चालला आहे. विदर्भातील अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या बेफिकीरीमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवार) सायंकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार ? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोरोना विषाणूचा धोका हळूहळू वाढत चालला आहे. विदर्भातील अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या बेफिकीरीमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    राज्यात गेल्या २४ तासांत २५९ जणांना संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळमध्येही दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहेत, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गेल्या सात दिवसांत पंजाबमध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बैठकीत घेतला आहे. तसेच शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु रात्री ११ ते पहाटे ६ या काळात पुन्हा संचारबंदी करणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत.