मंदिरे खुली करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले कि, कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे विचार करूनच पावले उचलावी लागतील. विरोधासाठी विरोध नको. संभाजीनगरचे खासदार रस्त्यावर उतरल्यावर तिथे सर्व फज्जा उडालेला दिसतो आहे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे.

मुंबई : मंदिरे खुली करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे. अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले कि, कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे विचार करूनच पावले उचलावी लागतील. विरोधासाठी विरोध नको. संभाजीनगरचे खासदार रस्त्यावर उतरल्यावर तिथे सर्व फज्जा उडालेला दिसतो आहे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही.

मुंबईत काल अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये असं घटनेत लिहिलं आहे का? तुमच्या लोकांनाच ठेवून काम करावे अशी अपेक्षा आहे का? केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर बदल्या झाल्या नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत बदल्या राज्याच्या हितासाठीच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे.