राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात जोरदार ‘पत्र वॉर’

राज्यातील मंदिरे सुरू करण्यावरून सध्या राज्यपाल आणि मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. राज्यपालांनी मंदिरांबाबत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी पत्र लिहून उत्तर दिले आहे.

राज्यातील मंदिरे (temples) सुरू करण्यावरून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackray) यांच्यात जोरदार ‘लेटर वॉर’ रंगले आहे. राज्यात बार सुरू झाले, मंदिरे कधी सुरू होणार, या राज्यपालांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील एका पत्रातून उत्तर दिले आहे.

        पत्राच्या सुरुवातीला राज्यपालांनी वापरलेल्या इंग्रजी भाषेवरून टोमणा मारला आहे. “महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.  जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच.” असे या पत्रात म्हटले आहे.

      राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख होता. त्या मुद्द्यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. “महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणा-यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.” असे म्हणत राज्यपाल-कंगना भेटीवरही आसूड ओढला आहे.

      राज्यात मंदिरे सुरू करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सवाल उपस्थित केले होते. महाराष्ट्रात मंदिरे सुरू करण्यावरून होत असलेल्या आंदोलनांचा उल्लेखही त्यात केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणतात, ‘’आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.”

 मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे ‘लेटर वॉर’ भविष्यात कुठले रुप घेते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.