महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात चित्रा वाघ यांनी घेतली राज्यपालांची भेट

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना विनंती करणारं एक पत्र दिलं आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांसाठी असणाऱ्या शिक्षेप्रमाणेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील सुनावणी, शिक्षा आणि नियम लागू करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

    मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना विनंती करणारं एक पत्र दिलं आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांसाठी असणाऱ्या शिक्षेप्रमाणेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील सुनावणी, शिक्षा आणि नियम लागू करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

    दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. त्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून विरोधकांवर तोंडसुख घेण्यात आलं. साकीनाका बलात्कार प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने कथुआ आणि हथरसच्या अशाच घटनांची आठवण विरोधकांना करून दिली आहे.

    त्यावरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्र वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “हा तर जोक ऑफ द डे झाला”, अशा खोचक शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

    तसेचं राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या गोष्टी तुम्ही करता. पण तो तर बाजूलाच राहिला. पण या बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतंय. ज्याच्यावर एफआयआर आहेत ते बाहेर उजळ माथ्याने फिरतायत. आज बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला. तुम्ही घेत असलेली ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजपा घेणार. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्रश्न विचारणार आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, अशा शब्दांत वाघ यांनी निशाणा साधला.

    “हथरस, कथुआबद्दल संवेदना आहेत”

    दरम्यान, देशातील बलात्काराच्या इतर घटनांबद्दल आम्हाला संवेदना असल्याचं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. “हथरस, कथुआ देशातल्या सगळ्या घटनांबद्दल आम्हाला संवेदना आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात राहातो. ही आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल”, असं त्यांनी नमूद केलं.