Crowds at nightclubs in Mumbai; A warning to impose night curfew if not improved

मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेला ख्रिसमस आणि थर्टी फस्टला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पालिका दक्ष असून, गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेची पथके तैनात करण्यात आली आहेत.

काही दिवसांवर ख्रिसमस सण येऊन ठेपला आहे. त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताचा दरवर्षीप्रमाणे जल्लोषही होणार आहे. पण, या सण आणि उत्सवाच्या जल्लोषाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लगाम घालणे आवश्यक आहे. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टला सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. गर्दीमुळे पाळले न जाणारे सोशल डिस्टन्स आणि नाका-तोंडावर मास्क लावण्याचे न राहणारे भान यामुळे  कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते. यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्या महिन्यातल्या गुढीपाडव्यापासूनचे सर्व सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोना नियंत्रणात येत असतानाच मोठ्या प्रमाणात लोक गणेशोत्सवासाठी गावी गेले. राज्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. लोकांची ये-जे वाढली. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. तोच अनुभव गाठीशी घेत दिवाळीतही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, दिवाळी सणाच्या उत्साहावर पालिकेने निर्बंध लादले. लक्ष्मीपूजनाला शोभेचे फटाके लावण्याव्यतिरिक्त इतर दिवशी सार्वजनिक ठिकाणी फटाके लावण्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र लोकांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके लावले नाहीतच, शिवाय इमारतींच्या आवारातही फटाके न लावून पालिका प्रशासनाला सहकार्य केले. अशा सूज्ञ लोकांचे कौतुक करत पालिका आयुक्तांनी त्यांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे ख्रिसमस सणही गर्दी न करता साधेपणाने साजरा करावा आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीत साजरा केला जाणारा नववर्ष स्वागताचा जल्लोष टाळावा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे.

मुंबई महापालिका प्रशासन केवळ आवाहन करून थांबणार नाही. तर, २० डिसेंबरपर्यंत अंदाज घेऊन त्यानंतर नियमावली अधिक कडक करण्याबाबत पावले उचलणार आहे. त्यासाठी पालिकेची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांची विभागवार गस्त राहणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.