सीआयडी ‘ॲक्शन मोड’मध्ये; खंडणी वसुलीप्रकरणी परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आयुक्त असताना त्यांनी केलेल्या गैरकारभाराविरुद्धच्या तपासामध्ये राज्य गुन्हा अन्वेषण विभाग आता 'ॲक्शन मोड'मध्ये आली असून त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने पुराव्यांची जमवाजमव सुरू केली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आयुक्त असताना त्यांनी केलेल्या गैरकारभाराविरुद्धच्या तपासामध्ये राज्य गुन्हा अन्वेषण विभाग आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असून त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने पुराव्यांची जमवाजमव सुरू केली आहे.

    दरम्यान परमबीर सिंग, सध्या एनआयएच्या कोठडीत असलेले वादग्रस्त माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, निरीक्षक राजेंद्र कोथमिरे आणि इतरांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले संभाषणाचे रेकॉर्ड, विविध ठिकाणाहून खरेदी केलेल्या साहित्याची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परमबीर हे गेल्या दोन महिन्यांपासून आजारी रजेवर आहेत. सध्या होमगार्डचे महासमादेशक असलेल्या सिंग यांच्यावर पूर्वीच्या ठिकाणी कार्यरत असताना भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले आहेत. ठाण्यात आयुक्त असताना त्यांनी आपल्याकडून तीन कोटीची खंडणी वसूल केली होती. तत्कालीन खंडणीविरोधी पथकाचा प्रमुख शर्मा, निरीक्षक कोथमिरे आदींच्यामार्फत त्यांनी ‘मोक्का’अन्वये खोटा गुन्हा दाखल करून खंडणी उकळली होती, अशी तक्रार क्रिकेट बुकी सोनू जलान, केतन तन्ना, मुनीर पठाण यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार दिली होती.

    या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे, पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारदारांचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत.

    निरीक्षक कोथमिरे यांनी सोनू जालान याच्या नावावर स्वतः व मुलांसाठी महागडे कपडे तसेच घड्याळ खरेदी केल्याचा आरोप आहे. खरेदीच्या पावत्या, तसेच परमबीर व अन्य अधिकाऱ्यांनी इतरांकडून वसूल केलेल्या खंडणीबद्दलच्या मोबाइलवरून केलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप जमा करण्यात येत आहेत, त्यासाठी तक्रारदार व अन्य साक्षीदारांसमवेत संबंधित ठिकाणी जाऊन पडताळणी केली जात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.