सिडको-सहकार खात्याचा भोंगळ कारभार, १८ हजार गृहनिर्माण सोसायट्या सांभाळतायेत केवळ तीन कर्मचारी, हजारो तक्रारी पडून

नवीमुंबईतील सिडको भवनमध्ये सहकार निबंधकांच्या कार्यालयात केदारी जादव हे सहनिबंधक बसतात. त्यांच्या जोडीला दोन कर्मचारी काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांचा एकहाती कारभार सुरू असून येथे सामान्यांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. केवळ मलाईदार फायली आणि वजनदार संस्थाची कामे लगबगीने केली जातात, असा आरोप समाजिक कार्यकर्ते अजित सोनावणे यांनी बोलताना केला.

मुंबई – राजा आदाटे

जवळपास 28 हजाराच्या वर असलेल्या गृहनिर्माण संस्था, शेकडो सहकारी बँका, पथसंस्था, विविध सहकारी संस्थांचा कारभार संभाळण्यासाठी सहकार खात्याने केवळ एक अधिकारी आणि दोन कर्मचारी नेमले असून गेल्या दोन दशकांपासून नवीमुंबईतील हजारो तक्रार अर्ज आणि सुनावण्यांच्या फायली धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे हजारो सोसायट्यांच्या निवडणूका होवू शकलेल्या नाहीत आणि त्यांच्या वार्षिक लेखा जोख्यांचा हिशोबाला कोणीही वाली नाही. या प्रकाराने संतापलेल्या नागरीकांनी आणि अधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा दरवाजा ठोठावला होता. मात्र यालाही एक वर्ष उलटले तरी अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.

जवळपास हजारभर कर्मचारी नेमण्याची गरज

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध सहकारी संस्थाच्या नोंदणीचा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा कारभार सहकार निबंधकाकडे असतो. पुणे जल्ह्यिातील अंदाजीत 15 हजार सोसायट्यांसाठी एक सह निबंधक, सहा उबपनिबंधक, 4 सहाय्यक निबंधक आणि जवळपास 80 ते 90 कर्मचार्‍यांचा स्टाफ कार्यरत आहे. मराठवाड्यातील 9 हजारच्या आसपास असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या सनियंत्रणासाठी 3 सहनिबंधक, 11 उपनिबंधक आणि 60 सहाय्यक निबंधकांचा तापा कार्यरत आहे. जवळपास 500 पेक्षा जास्त कर्मचारी येथे काम करतात. या तूलनेत नवीमुंबईचा कारभार कितीतरी पटीने मोठा असूनही येथे केवळ 1 सहाय्यक निबंधक आणि 2 कर्मचारी या तीन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. हजार कर्मचार्‍यांचे काम या तीनच व्यक्ती वर्षानूवर्षे करत आहेत. शिवाय त्यांना सिडको भवन येथे देण्यात आलेले कार्यालयही खुपच छोटेसे आहे.

कर्मचारी नेमण्याचा एक रूपयाचाही भार सरकारवर नाही

याबाबत महाराष्ट्र राज्य सहकार विभाग राजपत्रीत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले की, हा आवश्यक लागणारा कर्मचारी वर्ग नेमण्याचा एक रूपयाचाही भार सरकारवर अथवा सहकार खात्यावर येत नाही. कारण नियमाप्रमाणे त्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कार्यालयीन व्यवस्था लावण्याची आणि त्यांच्या वेतनाची जबाबदारी ही सिडकोने करावयाची आहे. राज्याच्या सहकार खात्याने केवळ नियुक्त्या करून सिडकोला संबंधित अधिकारी नेमण्याची सुचना करावयाची आहे. त्यामुळे शासनाने फक्त नेमणूकी करून सुचना करण्याचे काम केल्यास बराचसा कामाचा ताण हलका होवून जनतेच्या समस्यांना गतीने न्याय मिळू शकतो.

ए फायलींची झाली आहे दुरावस्था

सहकारी संस्थांसाठी अत्यंत महत्वपुर्ण मानल्या जाणार्‍या ए फाईल्स अखेरपर्यंत जतन करण्याची जबाबदारी सहकार निंबधकांच्या कार्यालयावर असते. मात्र या कार्यालयाची अवस्था आणि सोसायट्यांची संख्या पाहता या फायलींची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली असल्याचे सांगण्यात आले.

मलाईदार फायलींचाच होतो निपटारा

नवीमुंबईतील सिडको भवनमध्ये सहकार निबंधकांच्या कार्यालयात केदारी जादव हे सहनिबंधक बसतात. त्यांच्या जोडीला दोन कर्मचारी काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांचा एकहाती कारभार सुरू असून येथे सामान्यांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. केवळ मलाईदार फायली आणि वजनदार संस्थाची कामे लगबगीने केली जातात, असा आरोप समाजिक कार्यकर्ते अजित सोनावणे यांनी बोलताना केला. कितीतरी सोसायट्यांच्या तक्रारी धुळ खात पडल्याची व्यथा घेवून लोक आपल्याकडे येत असल्याचे त्यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.

कोट

गेल्या 10 वर्षांपासून आमच्या नवीमुंबईतील श्री शांतीनिकेतन सहकारी गृनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारणसभा आणि निवडणूक झालेली नाही. चार वर्षांपासून पैसे भरूनही निवडणूक कार्यक्रमाबाबत निबंधकांच्या कार्यालयाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

रामचंद्र देवरे, शिवसेना विभाग प्रमुख, नवी मुंबई.

कोट

याबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास मी त्यात लक्ष घालीन. तूर्तास मला याबाबत काहीही कल्पना नाही.

- बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री.