सिटीझन्स कलेक्टिवने आदित्य ठाकरे यांना शाश्वत विकासात्मक धोरणांचे आवाहन करत केल्या पाच शिफारशी

मुंबई: मुंबईची जादू टिकवून ठेवण्यासाठी काम करणा-या सिटीझन्स कलेक्टिव संस्थेने बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाची घोषणा केली आहे. शहरातील जैवविविधता व हिरवाई संरक्षित करण्यासाठी हवामानावर समावेशक व सक्रिय चर्चेचे नेतृत्व करणा-या तरुण व प्रगतीशील मुंबईकरांची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश या अभियानापुढे आहे. या उद्दिष्टाशी सुसंगती राखत, शहराची समृद्ध जैवविविधता जपण्यासाठी सरकारला कृतीकरिता प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तरुण आणि या विषयातील तज्ज्ञ एकत्र आले आहेत.

गेल्या काही दशकांत शहरांतील उद्याने व नैसर्गिक जंगले कमी होत चालली आहेत. विकासाच्या नावाखालील एतद्देशीय समुदायांचे कल्याण व उपजीविकेची सुरक्षितता दुर्लक्षिली जात जात आहे. त्याचवेळी गेल्या काही वर्षांत उरल्यासुरल्या पाणथळ जागांवरील फ्लेमिंगोंची संख्या अनेक पटींनी वाढली असल्याने या जागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्वतता व आधुनिकतेचा मेळ साधणा-या मुंबईतील जैवविविधता व हिरवाईचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी तरुण मुंबईकर एकत्र आले आहेत.

या अभियानामध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या प्रमुख संबंधितांसोबत संवाद साधण्याचा तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील जैवविविधतेच्या भवितव्यावर संभाषण सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. या आवाहनात एक पाचकलमी कृतीयोजना आहे. यामध्ये कमी संख्येतील फ्लेमिंगो व त्यांच्या वसतिस्थानांच्या संरक्षणाचा समावेश आहे; आरेला वन म्हणून मान्यता देणे आणि मुंबईतील हिरवाईचे संरक्षण करणे; कोळी समुदायाच्या उपजीविकेसाठी समुदायातील सदस्यांशी चर्चा करून सहाय्यात्मक धोरणाचा प्रस्ताव ठेवणे; आणि मुंबईतील उद्याने वाढवणे व त्यांचे संरक्षण करणे आदी शिफारशींचा समावेश आहे.

या चळवळीतील एक सहयोगी तसेच वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभात म्हणाले, “निसर्ग संकटात आहे. मानवजातीच्या इतिहासातील कोणत्याही काळाच्या तुलनेत १००० पट अधिक वेगाने आपल्या प्रजाती नष्ट होत आहेत. १ दशलक्ष प्रजाती नामशेष झाल्या आहेत. निसर्गाला संकटातून बाहेर काढण्याची संधी २०२० या वर्षाने आपल्याला दिली आहे. म्हणूनच आम्ही बायोडायव्हर्सिटी बाय द बे हे अभियान सुरू करत आहोत. मुंबईतील यंत्रणा व राज्य सरकार तसेच एतद्देशीय व स्थानिक समुदायांसह समाजातील सर्व घटकांना त्वरित व रूपांतरणात्मक कृतीसाठी प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे. मुंबईतील नैसर्गिक जैववैविध्यपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा सर्व मुंबईकरांनी केली पाहिजे.”

आज अशाश्वत नियोजन व जलदगतीने वाढणारे कार्बन उत्सर्जन यांमुळे मुंबई गंभीर स्थितीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. शहरातील समृद्ध परिसंस्था व अनन्य जैवविविधता धोक्यात आहे. याचा शहरावर अनेक अंगांनी परिणाम झाला आहे. त्यातच कमी होत जाणारी हिरवाई व जंगलतोड या दोन मोठ्या समस्या आहेत. आयआयटी बॉम्बेने जानेवारी २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, शहरातील ६० टक्के हिरवाई गेल्या ४० वर्षात नष्ट झाली आणि आता शहराच्या केवळ १३ टक्के भागावर हिरवाई आहे. गोरेगाव, अंधेरी पश्चिम आणि मालाड या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. २००१ मध्ये हिरवे क्षेत्र ६२.५ टक्के होते, २०११ मध्ये ते १७ टक्क्यांवर आले.

सिव्हीस या सहयोगी संस्थेच्या अंतरा वासुदेव या चळवळीबद्दल म्हणाल्या, “मुंबईला जर शाश्वत नगरनियोजनाची कास धरण्याची गरज असेल तर या चळवळीचे नेतृत्व लोकांनी केले पाहिजे. उद्यानांसारख्या सामाईक सुविधांमधील नागरिकांच्या विधायक सहभागामुळे सरकारला धोरणे आखण्यासाठी कृतीयोग्य फीडबॅक तर मिळतोच, शिवाय समुदायांच्या सहभागामुळे सार्वजनिक स्थळांची सामुदायिक मालकीही अधोरेखित होते.”

या चळवळीत एका टाउनहॉलचाही समावेश असेल. यामध्ये राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याचे प्रतिनिधी, भविष्यातील हिरव्या मुंबईची कल्पना करणा-या तरुणांच्या कलाकृती, संगीत मैफिली, आवश्यक धोरणात्मक उपायांवर आधारित चर्चांना तोंड फोडणा-या व्हर्च्युअल परिषदा होतील. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील गायत्री सिंग व झमान अली यांच्यासह शहरातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हर्च्युअल परिषद घेतली.

पाणथळ जागांच्या व्यवस्थापनासाठी तसेच जतनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे विश्लेषण तसेच शाश्वत धोरणनिर्मितीवर प्रभाव टाकणा-या शिफारशींचे मसुदे लिहिण्याची प्रक्रिया यांवर या परिषदेत चर्चा झाली. शहरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट्स व प्राध्यापक राहुल काद्री, शिल्पा चंदावरकर आणि प्रणव नाईक अशाच प्रकारची एक परिषद आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या घेत आहेत. यात शाश्वत शहर रचना व नागरी विकासावर चर्चा होणार आहे.

बीएमसीने आपले खुल्या जागा धोरण तयार केले आहे व पालिकेच्या २०१४-२०३४ या काळासाठीच्या विकास आराखड्यात शहरासाठी प्रतिव्यक्ती ६.१३ चौरस मीटर खुल्या जागेचा वायदा केला आहे. यात जंगले, तिवरे यांचाही समावेश आहे. यात १०० नवीन उद्यानांचाही वायदा केलेला आहे. यातील किती खुली हिरवी जागा लोकांना वापरता येईल हा मोठा प्रश्न आहे. मुंबई हे देशातील सर्वांत जलद नागरी वाढ होत असलेल्या शहरांपैकी एक आहे. यात वायू प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, पाण्याची टंचाई आणि निकृष्ट सार्वजनिक संरचना यांची भर पडत आहे. त्यामुळेच तरुण मुंबईकरांना एकत्र येऊन शहर वाचवण्याची प्रेरणा मिळाली आहे.