pooja chavhan

  पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली असल्याचे सांगितले जात आहे. पूजा आत्महत्या प्रकरणात राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीनचिट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  आई-वडिलांनी नोंदविला जबाब

  पूजाच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांत आपला जबाब नोंदविला आहे. आपली कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असे पूजाच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाला विनाकरण राजकीय वळण देण्यात आले, मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार राजकीय नाट्य होते, असे पूजाच्या आई-वडिलांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांच्या तपासानंतर राठोड यांना क्लीन चिट देण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. या संदर्भातील अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला आहे.

  याबद्दल झोन पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात आमची कोणत्याही व्यक्तीविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा आमचा तपास सुरू आहे. दरम्यान, पूजाच्या आई-वडिलांनी नोंदविलेल्या जबाबामुळे राठोड यांना या प्रकरणातून एकाप्रकारे क्लिन चिट मिळाल्याचेच स्पष्ट होत आहे.

  मंत्रिमंडळात लवकरच कमबॅक

  काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता राठोड यांना पोलिसांनी क्लीनचिट दिल्यामुळे राठोड हे राज्य मंत्रिमंडळात लवकरच कमबॅक करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
  बॉक्स

  गृहमंत्र्यांनी नाकारले !

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र पोलिसांनी साठोड यांना क्लिच चिट दिल्याचे वृत्त नाकारले आहे. या प्रकरणी पुणे पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही, असे पाटील म्हणाले.