पुढील ३ दिवस राज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील ४८ तास हे रिमझिम पाऊस असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे. तसेच खान्देशात धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई : राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात काही भागात रिमिझिम पाऊस पडला आहे. तसेच पुढचे तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील ४८ तास हे रिमझिम पाऊस असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे. तसेच खान्देशात धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खान्देशमध्ये जळगावला पुढील २ दिवस शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह विर्भातील काही भागांत संतत धार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे थोडा गारवा पसरत असला तरी पाऊस पडून गेल्यावर खूप जास्त उकाडा वाढत आहे. राज्यात सर्वजण थंडीची आतूरतेनं वाट पाहात असताना अचानक आलेल्या या पावसानं सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

ऐन हिवाळ्यात पाऊस पडू लागल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. पुन्हा पावसाने जोर धरला तर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. जोरदार पाऊस झाल्यास झाडांना आलेला मोहोरही गळून पडण्याची पडू शकतो. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे दिसते आहे. राज्यातील बळीराजाला पुन्हा संकटाला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे.