मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर, जखमींच्या उपचाराचा खर्चही करणार, जाणून घ्या तपशील

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

    मुंबई : मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

    मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

    मुंबईच्या मालाड भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मालाड पश्चिमेतील मालवणी भागात ही दुर्घटना घडलीय. या घटनेत १८ जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. मुंबई महापालिका आणि अग्निशमन विभागाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.

    मालाड पश्चिमेच्या मालवणी भागातील एका तीन मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला हा शेजारी असणाऱ्या एक मजली चाळीवर कोसळल्यामुळे ही गंभीर घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर८ जण गंभीर जखमी झाले.