मुख्यमंत्र्यांकडून ऊर्जामंत्र्याचे कौतुक: आवाहनाला प्रतिसाद सरकार विरोधातील जेलभरो आंदोलन केले स्थगित!

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरी आणि ग्रामिण भागांत रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील त्यामुळे भाजपने तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे- चंद्रशेखर बावनकुळे

    मुंबई: मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी थेट संवादात ऊर्जामंत्री नितीन राऊत यानी कोरोनाच्या कारणामुळे स्वत:च्या मुलाच्या लग्नाचा सोहळा रद्द केल्याबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केले होते. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही नेते दाखवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या आवाहनाला विद्यमान ऊर्जामंत्र्यांनंतर आता माजी ऊर्जामंत्री भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील तात्काळ प्रतिसाद देत विज बिलांच्या सक्तीच्या वसुली विरोधातील प्रस्तावित जेलभरो आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असल्याचे बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले.

    ५६० ठिकाणी जेलभरो स्थगित
    भाजपने वाढीव वीज बिल माफीसाठी राज्यात ५६० ठिकाणी २४ तारखेला जेलभरो आंदोलन ची हाक दिली होती.परंतु राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. राज्यातील ५६० ठिकाणी वाढीव वीज बिलाविरोधात जेलभरो आंदोलन करुन सरकारला घेरण्याची तयारी भाजपने केली होती.  त्यावेळी ५० हजार कार्यकर्ते जेलमध्ये जातील असे नियोजन भाजपने केले होते. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे.