cocaine

डीआरएने गुप्त माहितीच्या आधारे (DRA arrested cocaine smugglers ) सापळा रचून दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. संबंधित आरोपींकडून २.२२ किलो वजनाचं १३ कोटी ३५ लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

    मुंबई : महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाने (DRA) मुंबईत कोकेन तस्करीसंदर्भात ( action on Cocaine Smuggling) मोठी कारवाई केली आहे. डीआरएने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन परदेशी नागरिकांना अटक  केली आहे. संबंधित आरोपींकडून २.२२ किलो वजनाचं १३ कोटी ३५ लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

    आरोपींनी या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी स्वतः च्या पोटाचा वापर केला होता. दोघांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातून कोकेनच्या १५१ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

    मादक पदार्थांची तस्करी करणारे दोन्ही आरोपी टांझानिया या देशाचे नागरिक आहेत. मतवाजी कार्लोस अँडम आणि रशीद पौल सायला अशी त्यांची नावं आहेत. जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटात लपवलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या पोटातून जप्त करण्यात आलेल्या १५१ गोळ्यांची किंमत १३ कोटी ३५ लाख आहे.

    आरोपींनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा मिळवला होता. कोकेनच्या गोळ्या पोटात ठेवलेले ते दोघे २२ एप्रिलला टांझानियाहून मुंबईला आले. संशयास्पद हालचालीमुळे डीआरएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांची चौकशी सुरू असताना आरोपींनी पोटात दुखत असल्याचा बहाणा सुरू केला. त्यामुळे संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेलं. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या पोटात लपवलेल्या कोकेनच्या १५१ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.