शुद्धीवर येऊन बोला, मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश केंद्राचाच – वडेट्टीवार

भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. केंद्राच्या पत्रानुसार मंदिरं उघडण्याचा प्रश्नच नाही. कारण संपूर्ण अधिकार केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला तर उद्याच आम्ही निर्णय घेऊ.

    मुंबई: राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आज राज्यातील विविध भागात शंखनाद आंदोलन करत आहे. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचं पालन करत आहोत, असं सांगतानाच भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. केंद्राच्या पत्रानुसार मंदिरं उघडण्याचा प्रश्नच नाही. कारण संपूर्ण अधिकार केंद्राकडे आहे.

    केंद्र सरकारने निर्णय घेतला तर उद्याच आम्ही निर्णय घेऊ. केंद्राच्या आदेश आणि सूचनेप्रमाणे आम्ही काम करत आहोत. त्यांच्या सूचना केवळ महाराष्ट्रासाठी नाहीत तर देशासाठी आहे. आताच तुम्ही पाहिलं असेल केरळमध्ये ओणम या सणात मागच्या चार दिवसात एक लाखाच्यावर केसेस दाखल झाल्या. तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलाय का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

    भाजपच्या भावना काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. सर्वात जास्त गोमांस निर्यात करणारा भाजपचा आमदार आहे. हे सर्वांना माहीत आहे. कंपनीचं नाव मात्रं मुस्लिमांचं दिलं. एकीकडे गोहत्या करायच्या आणि दुसरीकडे गाईचं संरक्षण आणि गोमाता म्हणायचं ही दुटप्पी भूमिका भाजपची राहिली आहे. भाजपने मंदिरं सुरू करण्याची मागणी करण्यापेक्षा मोदींना साकडं घालावं आणि देशभरातील कोरोना संपण्यासाठी प्रयत्न करावे. मंदिरे उघडे करण्याचे आदेश काढा असं मोदींना सांगा. म्हणजे मंदिरं सुरू होतील, भाजपला आंदोलन आणि दिखावा करण्याची वेळ येणार नाही. ही सर्व परिस्थितीत अशा प्रकारचे इशारे देणं किंवा आंदोलन करणं योग्य नाही, असा घणाघातही त्यांनी केला

    मतं मिळवण्यासाठी धार्मिक भावना भडकावणं हा भाजपचा एकमेव उद्देश आहे. हा शंखनाद महाराष्ट्राच्याविरोधात नसून तो केंद्र सरकारच्या विरोधात असावा. केंद्र सरकारच्या विरोधात भाजप हा शंखनाद का करत नाही. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे तरी मंदिर उघडी आहेत का? हे राज्यातील भाजपने पाहवे. दारुची दुकाने उघडली जातात. मंदिरे का नाही?, असा सवाल भाजप करत आहे. पण मध्य प्रदेशात काय आहे? कोणत्या राज्यात मंदिर उघडली गेली? मध्य प्रदेशात काय दारुची दुकाने उघडलेली नाही का? तिकडे त्यांच्या राज्यात यूपी, हरियाणा आणि कर्नाटकात दारुची दुकाने बंद आहे का? कर्नाटकातील मंदिरं सुरू आहेत का? काही तरी शुद्धीवर येऊन बोला. बेशुद्ध, बेधुंद असल्या सारखं बोलू नका. केवळ सरकारविरोधी आहोत म्हणून बोलू नये. असा पलटवार वडेट्टीवर यांनी भाजपावर केला आहे.