मुंबईचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे आयुक्तांचे आश्वासन: सचिन सावंत

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस  असून घरोघरी गणेशोत्सवाची तयारीही सुरु आहे. याकाळात पाणी कपात केल्याने सामान्य मुंबईकरांच्या त्रासात भर पडली आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयाचा पूनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबई महानगर पालिकेला ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करावी लागली आहे. परंतु सध्या मुंबईत गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बहुसंख्य महिला घरातच काम करत आहेत. अशा स्थितीत पाणी कपात ही त्रासदायकच आहे. सणासुदीचा विचार करुन पाणी कपातीचा हा निर्णय रद्द करावा व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती पालिका आयुक्तांना केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत पाणी पुरवठा लवकरच सुरुळीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे.